समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र | Savitribai phule Biography

Savitribai phule Information In Marathi – सावित्रीबाई ज्योतिराव फुले या एक प्रख्यात भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. ज्यांनी एकोणिसाव्या शतकात महिला शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळातील मोजक्या साक्षर स्त्रियांमध्ये त्यांची गणना होते. पुण्यात त्यांनी महात्मा फुले यांच्यासोबत भिलवाड्यात शाळेची स्थापना केली. त्यांनी बालविवाह निर्मूलन, मुलींचे शिक्षण, समाजातील उपेक्षित लोकांसाठी खूप काम केले आणि सती प्रथेविरुद्ध प्रचार केला आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. Savitribai phule या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या दलित जातीच्या उत्थानाचे प्रतीक मानल्या जातात कारण त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध मोहीम चालवली आणि जात आणि लिंग आधारित भेदभाव दूर करण्यासाठी सक्रियपणे काम केले.

तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती (Savitribai phule Biography In Marathi) पाहणार आहोत.

Savitribai phule Information in Marathi
Savitribai phule Information in Marathi
नाव (Name)सावित्रीबाई फुले
जन्म (Birth)३ जानेवारी १८३१
जन्म स्थान (Birth Place)नायगाव, ब्रिटिश भारत (सध्या सातारा जिल्हा, महाराष्ट्र)
विवाह (marrige)१८४०
पतीचे नाव (Husband)ज्योतिराव फुले
व्यवसाय (Profession)शिक्षिका, समाज सेविका
मृत्यू (Death१० मार्च १८९७ (वय ६६)
मृत्यूचे ठिकाण(पुणे) महाराष्ट्र, ब्रिटिश भारत

सावित्रीबाई फुले यांचे प्रारंभीचे जीवन । Savitribai Phule Early Life

सावित्रीबाई फुले यांचा जन्म (सावित्रीबाई फुले जयंती) ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव (सध्या सातारा जिल्ह्यातील) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मी होते. सावित्रीबाई आपल्या आई वडिलांची मोठी कन्या होती. त्या काळात मुलींची लग्ने लवकर होत असत, त्यामुळे प्रचलित रितीरिवाजांनुसार नऊ वर्षांच्या सावित्रीबाईंचा विवाह १२ वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी १८४० मध्ये झाला. महात्मा ज्योतिराव फुले हे विचारवंत, लेखक, समाजसेवक आणि जातीविरोधी समाजसुधारक होते. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील प्रमुख आंदोलकांमध्ये त्यांची गणना होते. सावित्रीबाईंचे शिक्षण लग्नानंतर सुरू झाले. ज्योतिरावांनीच सावित्रीबाईंना लिहिण्यास व शिकण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी एका सामान्य शाळेतून तिसरी आणि चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील मिस फरार इंस्टीट्यूशन (Ms Farar’s Institution) संस्थेत प्रशिक्षण घेतले. ज्योतिराव फुले हे सावित्रीबाईंच्या सर्व सामाजिक कार्यात त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले.

मित्रांनो वरील उताऱ्यावरून आपल्याला हे समजते की महात्मा ज्योतिराव फुले हे सावित्रीबाईंचे पती तर होते सोबतच ते त्यांचे शिक्षक आणि मार्गदर्शक सुद्धा होते. ज्योतिरावांच्या विचारातून आणि प्रयत्नातून सावित्रीबाई ह्या महाराष्ट्राच्या प्रथम शिक्षिका आणि थोर समाजसुधारक झाल्या. धन्य ती माउली जिच्या कर्मप्रथाने आज आपण जातीपातीच्या बंधनातून मुक्त होऊन एक सुशिक्षित समाज निर्माण करू शकलो.

सावित्रीबाई फुले याचे कार्य | Savitribai Phule Work

आता आपण सावित्रीबाईंचे शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य विशेषकरून स्त्रिया आणि दलितांसाठीचे कार्य, त्याचबरोबर त्यांनी लेखन आणि कविता केलेल्या आहेत. सावित्रीबाईंनी महिलांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून महात्मा ज्योतिबासोबत आंदोलने केलीत आणि ब्रिटिश सरकारकडून स्त्रियांसाठी न्यायहक्क मिळवले हे त्यांचे महत्वपूर्ण राजकीय कार्य आहे.

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य

Savitribai Phule is The First Lady Teacher Of Maharashtra or India

१८४८ मध्ये, सावित्रीबाई फुले केवळ १७ वर्षांच्या असताना, त्यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत दलित आणि महिलांना शिक्षण देण्यासाठी एक शाळा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या शाळेत फक्त 9 मुली होत्या. असे म्हणतात की, Savitribai phule जेव्हा शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा वाटेत लोक त्यांच्यावर शेण, माती वगैरे टाकायचे, पण या सगळ्यामुळे सावित्रीबाईंचा आत्मविश्वास डळमळला नाही. अशा परिस्थितीत शाळेत जाताना त्या नेहमी सोबत साडी घेऊन जायच्या. वाटेत लोक चिखल आणि शेण फेकून विरोध करीत असत त्यामुळे शाळेत आल्यावर दुसरी साडी नेसून त्या मुलींना शिकवीत असत.

अनेक संघर्षांनंतर १ जानेवारी १८४८ ते १५ मार्च १८५२ पर्यंत सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासमवेत कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय जास्तीत जास्त मुलींना शिक्षण देण्याच्या उद्देशाने १८ शाळा उघडल्या. त्याच वेळी, यापैकी एक शिक्षण केंद्र मुस्लिम महिला आणि मुलांसाठी १८४९ मध्ये पूना येथेच उस्मान शेख यांच्या घरी उघडण्यात आले.

माई सावित्रीबाई फुले यांना देशातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या, संचालिका आणि प्राचार्या म्हणूनही ओळखले जाते म्हणून सावित्रीबाई फुले यांना महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या प्रथम महिला शिक्षिका म्हणतात. अशाप्रकारे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान पाहून ब्रिटिश सरकारच्या शिक्षण विभागाने १६ नोव्हेंबर १८५२ रोजी शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

सावित्रीबाई फुले यांचे अस्पृश्यांच्या उद्धारासाठी केलेले कार्य

सावित्रीबाईंचे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलितांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून आपल्या घराचे हौद/विहीर खुले केले. त्यामुळे अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणी मिळाले परंतु समाजाच्या ठेकेदारांचा त्यांच्या वडिलांवर प्रभाव असल्यामुळे सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना घर सोडावे लागले.

२४ सप्टेंबर १८७३ रोजी समाजहिताचे काम करण्यासाठी सावित्रीबाईंचे पती Jyotiba Phule यांनी त्यांच्या अनुयायांसह ‘सत्यशोधक समाज’ नावाची संघटना स्थापन केली. ज्याचे अध्यक्ष खुद्द ज्योतिबा फुले होते तर महिला प्रमुख Savitribai phule होत्या. या संस्थेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश म्हणजे शूद्र आणि अति-शूद्रांना उच्चवर्णीयांच्या शोषण आणि अत्याचारापासून मुक्त करून त्यांचा विकास करणे, जेणेकरून ते यशस्वी जीवन जगू शकतील.

अशा प्रकारे स्त्रियांसाठी शिक्षणाचा प्रवाह उघडणाऱ्या सावित्रीबाईंनी पती ज्योतिबांच्या प्रत्येक कामात खांद्याला खांदा लावून सहकार्य केले.

सतीप्रथा विरोध आणि विधवा पुनर्विवाह

सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणाकडेच लक्ष दिले नाही, तर स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या. त्यांनी १८५२ मध्ये “महिला सेवा मंडळ” स्थापन केले आणि भारतीय महिला चळवळीच्या पहिल्या नेत्या बनल्या.

सावित्रीबाईंनी विधवांची स्थिती सुधारण्यासाठी आणि भ्रूणहत्येवरही काम केले. त्यासाठी त्यांनी विधवा पुनर्विवाह सुरू केला आणि १८५४ मध्ये विधवांसाठी आश्रमही बांधला.

याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या थांबवता याव्यात यासाठी त्यांनी नवजात बालकांसाठी आश्रम सुरूकेले. तर दुसरीकडे स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून ती मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे. त्यावेळी सावित्रीबाईंनी आपले लक्ष त्यावर केंद्रित करून भ्रूणहत्या थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद होते.

त्याचवेळी सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने काशीबाई नावाच्या गरोदर विधवेलाही आत्महत्येपासून परावृत्त केले होते आणि तिला घरी ठेवले होते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांची काळजी घेतली होती आणि वेळेवर त्यांची प्रसूती केली नंतर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी काशीबाईचा मुलगा यशवंत याला दत्तक घेऊन त्याला खूप शिकवले आणि त्याला डॉक्टर बनविले.

त्याच वेळी, या कारणामुळे त्यांना खूप विरोधाचा सामना करावा लागला, परंतु सावित्रीबाईंनी स्वतःला सनातनीपणापासून दूर ठेवले आणि समाजाच्या कल्याणासाठी आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी अखंड कार्य करीत राहिले.

न्हाव्यांचा संप

विधवा स्त्रियांच्या केशवपणाबद्दल ज्योतीबारावांनी सभा बोलावली आणि तिथे या विषयावर आपले विचार मांडले. या सभेत आई सावित्री नामदेव न्हाव्याला उद्देशून म्हणाले, “सांगा बरं दादा, विधवाबाईचे केस कापण्याचा मोबदला तुम्हाला काय मिळतं?” नामदेव न्हावी म्हणाला, “त्या बदल्यात एक पैसा मिळतो.’ सावित्रीआई सर्व न्हाव्यांना उद्देशून म्हणाल्या, “एका पैशासाठी तुम्ही किती वाईट काम करता याची तुम्हाला जाणीव आहे काय? आधीच बिचारीचा नवरा मेल्याचं दुःख भरपूर असत. त्यात तिच्या डोक्याला वस्तारा लावून चेहरा विद्रूप करता, त्या बिचारीला किती वाईट वाटत असेल याचा विचार केलाय का तुम्ही कधी? त्या विधवेच्या ठिकाणी तुमची भगिनी ठेवून बघा. या साऱ्या तुमच्याच भगिनी आहेत. भावांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे काम तुम्ही बंद करा.”

सावित्रीबाई फुले यांचे हे विचार सर्व न्हाव्यांना पटले. त्या काळात दिनबंधू वृत्तपत्राचे संपादक नारायण मेघाजी लोखंडे कामगार संघटना चालवित होते. त्यांनी सर्व नाभिकांना संघटित केले. सर्व न्हाव्यांनी विधवा स्त्रियांच्या केसाला वस्तारा न लावण्याची प्रतिज्ञा केली.अशा पद्धतीने न्हाव्यांचा संप घडवून आणण्यात सावित्रीमाई व जोतीराव फुले यशस्वी झाले.

सावित्रीबाई फुले कविता। Savitribai Phule Poem

भारताच्या पहिल्या शिक्षिका आणि समाजसुधारकाव्यतिरिक्त, त्या एक चांगल्या कवयित्री होत्या त्यांनी दोन कविता पुस्तके लिहिली ज्यांची नावे खाली लिहिली आहेत.

  • काव्य फुले
  • बावनकशी सुबोधरत्नाकर

सावित्रीबाईंचे निधन

ज्योतीबांच्या निधनानंतरही त्यांनी समाजसेवा करणे सोडले नाही. याच काळात १८९७ साली पुण्यात “प्लेग” सारखा भयंकर रोग पसरला, तेव्हा या महान समाजसेविकेने या आजाराने त्रस्त लोकांची नम्रपणे सेवा सुरू केली आणि त्या दिवस-रात्र रुग्णांची सेवा करण्यात मग्न झाल्या. याच काळात सावित्रीबाईंना प्लेग झाला आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

सर्व प्रकारच्या समस्या, संघर्ष आणि समाजाचा तीव्र विरोध असतानाही सावित्रीबाईंनी ज्या प्रकारे लेखिका, क्रांतिकारी समाजसेविका बनून महिलांना शिक्षण देऊन त्यांची स्थिती सुधारण्यासाठी समाजहिताचे कार्य केले ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.

त्याचबरोबर महिला शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ अनेक पुरस्कारांची स्थापना केली असून त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटही काढण्यात आले आहे.

समाजासाठी त्यांनी दिलेले महत्त्वाचे योगदान सदैव स्मरणात राहील आणि त्यासाठी आपला देश त्यांचा सदैव ऋणी राहील. मी आणि माझी महाराष्ट्राची टीम भारताच्या या थोर, क्रांतिकारी आणि समाजसेविकेला नमन करीत आहे.

FAQ

प्रश्न – सावित्रीबाई फुले जयंती कधी असते?

उत्तर – ३ जानेवारी १८३१

प्रश्न – सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय होते?

उत्तर -महात्मा ज्योतिराव फुले

प्रश्न – सावित्रीबाई फुले कविता

उत्तर -काव्य फुले
बावनकशी सुबोधरत्नाकर

Leave a Comment